संपूर्ण महाराष्ट्र रेड झोनमध्ये, यंदा शाळा सुरू होणारच नाहीत

 


राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्य स्थितीत राज्यात तीन लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, जळगाव, नाशिक, नागपूर, धुळे, नगर, औरंगाबाद, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, यवतमाळ,चंद्रपूर, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र रेड झोनमध्ये असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक असल्याने यंदा शाळा सुरूच करायला नको असा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. 

   कोरोना साथीच्या काळात शाळांच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाने पहिल्यापासूनच सावध भूमिका घेतल्याचे दिसून येते. कोरोनाचा देशात शिरकाव झाल्यानंतर देशात पहिल्यांदा शाळा महाराष्ट्र सरकारनेच बंद केल्या होत्या. लॉकडाऊन उठल्यानंतरच्या काळातही शाळा सुरु करण्याची घाई राज्य शासनाने केली नाही. केंद्र सरकारने २१ सप्टेंबर पासून ९वी-१०वी चे वर्ग सुरु करण्याचे निर्देश दिल्यानंतरही महाराष्ट्र शासनाने मात्र राज्यात शाळा सुरु न करण्याचा निर्णय कायम ठेवला. जिथे कोरोनाचा प्रसार कमी आहे अशा ठिकाणी शाळा सुरु करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समित्यांना दिला. परंतु राज्यातील एकाही शाळा व्यवस्थापन समितीने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला नाही. आता संपूर्ण राज्यच रेड झोनमध्ये असल्याचे चित्र असताना राज्य सरकारचा शिक्षण विभाग या वर्षी शाळा सुरू करण्याबाबत अनुकूल नसल्याचे समोर आले आहे. शाळा बंद ठेवल्या तरी 'शाळा बंद शिक्षण चालू' उपक्रम सुरूच राहील असेही सांगण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या