इयत्ता १ली ते १२वी चा पाठ्यक्रम २५% कमी

    
कोरोना रोगाच्या साथीमुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक वर्ष सुरू केले असले तरी शाळा उशिरा सुरू कराव्या लागणार आहेत. वेळेत शाळा सुरू करता न आल्यामुळे अध्ययन-अध्यापनाला  खूप कमी कालावधी उपलब्ध होणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा विद्यार्थी व शिक्षक यांच्यावर तणाव राहू नये, त्यांच्यावर दडपण येऊ नये, यासाठी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमातील सुमारे २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. 
    कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सी.बी.एस.ई.ने पाठ्यक्रमात कपात केली आहे. त्याला अनुसरून महाराष्ट्र सरकारनेही आता इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व माध्यमांच्या अभ्यासक्रमातील सुमारे २५% भाग कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने या दृष्टीने तयारी चालू केली आहे. त्यांनी विविध विषयाच्या अभ्यास मंडळांना अभ्यासक्रम कमी करण्यास सांगितले आहे. कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम कोणता, याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या वेबसाईटवर देण्यात येईल, असे नामदार मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या