कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या मुलाला लिहिलेले पत्र

 



कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या मुलाला लिहिलेलं हे हृदयस्पर्शी पत्र वाचा. महाराष्ट्राला महान रूप हे असेच आलेले नाही! रयत शिक्षण संस्था मोठी व्हावी, बहुजनांची मुलं शिकावी यासाठी सर्वस्व अर्पण करणारे माणसं या मातीत जन्माला आली हे आपले भाग्य!


कर्मवीर अण्णाच्या स्मृतीस अभिवादन!

====================================

                                                                                                                             कर्मवीर भाऊराव पाटील

संस्थापक, रयत शिक्षण संस्था, सातारा.

ता. २६/३/१९५२

चि. अप्पासाहेब यास,
        अनेक आशीर्वाद! पिता या नात्याने तुला जन्म देणे या पलीकडे मी तुझ्यासाठी काही एक केलेले नाही. एवढेच नव्हे तर तुझ्या मातेचा शेवटचा सौभाग्य अलंकार, तोही मी हिरावून घेतला व तुझ्या मातेचा जन्मभर सेवा करता करता त्यातच तिचा अंत झाला. तेव्हा तू त्यागी माता-पित्याचा पुत्र आहेस व त्यागी घराण्यातील तू एक सुपुत्र आहेस व यातच सौख्य मानावयास पाहिजे. तुझे बरे व्हावे म्हणून माझे मेहुणे श्री. आदगौंडा पाटील यांनी तुला विमा धंद्याचे मार्गदर्शन केले व स्वतःचा २०,००० रुपयांचा विमा उतरला व नंतर ते चार महिन्यांनी वारले.
        तू नोकरी करू नये. अशी माझी पहिल्यापासून फारच इच्छा होती व आजही आहे. संस्थेच्या ज्या स्टोअर्समध्ये तू काम करीत आहेस, त्या स्टोअर्सला चालू वर्षी फारसा नफा झालेला नाही, यापुढेही मुळीच होणार नाही. त्यामुळे स्टोअर्सला नोकर कमी करावे लागतील, त्यात तुला कमी न करता दुसऱ्यास कमी करावे लागेल, हे स्वाभाविक आहे. अशावेळी तू नोकरी सोडावीस व विमा कंपनीचा अगर इतर धंदा तू करावास, अशी माझी तुला प्रेमाची सूचना आहे. काही दिवस तुला थोडे जड वाटेल. परंतु स्वतंत्र रीतीने तू आपल्या पायावर उभा राहिल्यास त्यातच तुला आनंद वाटेल. वडिलांकडून तुला आतापर्यंत काही मदत मिळालेली नाही व यापुढेही मिळणार नाही. तरी तू गरिबीचा संसार करून स्वावलंबी बनावे.
        शेवटची माझी नम्र सूचना अशी आहे की, माझ्या पूज्य मातोश्रीस तू जपावे व सांभाळावे. तिच्या खर्चाकरिता ऐतवडे येथील शेतीचे येणारे अंदाजे वार्षिक उत्पन्न रुपये ३०० ते ५०० हे मी तुला देत जाईन. कदाचित मी ही असमर्थ झालो तर माझादेखील भार तुला सहन करावा लागेल. याकरिताच तू स्वावलंबी व्हावे अशी माझी तुला सूचना आहे. कळावे, हा आशीर्वाद.

                                                        तुझा,
                                                    (B.P. PATIL)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या