मुलांना आता उन्हाळी सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत. मुलांचा ऑनलाईन अभ्यास पूर्णतः थांबलेला आहे. गेले वर्षभर अभ्यासाच्या नावाखाली मुलांच्या हातात मोबाईल होते. (त्यातून मुलांनी अभ्यास किती केला, याबाबत न बोललेलेच बरे.) सतत मोबाईल आणि इंटरनेटच्या वापराचे जे दुष्परिणाम होतात, ते दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून आले आहेत. शिक्षण क्षेत्रातले विविध मान्यवर, लेखक, शिक्षक यांनी सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियातून याबाबत भरपूर लिहिले आहे. त्यानुसार या कोरोना काळात मुलांचा स्क्रीनटाईम खूप वाढला आहे. त्याचा मुलांच्या डोळ्यांवर आणि एकूणच शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. तसेच मानसिक आरोग्यावर सुद्धा याचा वाईट परिणाम दिसून येत आहे. रात्री उशिरापर्यंत जागणे, सतत मोबाईल हातात घेऊन बसणे, मोबाईल थोडा वेळ जरी लांब ठेवला तर अस्वस्थ वाटणे, सतत चिडचिड करणे, विसराळूपणा, किरकोळ कारणाने सुद्धा लगेच मानसिक ताण वाढणे, झोप न लागणे, डोकेदुखी असे अनिष्ट परिणाम मुलांच्यामध्ये दिसून येत आहेत. काही ठिकाणी मुले पॉर्नच्या आहारी गेल्याचे चित्र समोर आले आहे. तर काही ठिकाणी मोबाईलमुळे अल्पवयीन मुलांची प्रेमप्रकरणे जुळल्याचे दिसून आले आहे. अभ्यासाच्या नावाखाली मुले-मुले एकमेकांशी चॅटिंग करत असल्याचे पालकांच्या गावीही नाही. अनेक मुलांचे पालकांशी नातेसंबंध बिघडले आहेत. मुलांना गेमचे व्यसन लागल्याचेही दिसून आले आहे. मैदानी खेळ, घरातील कामे, अभ्यास या गोष्टी कमी झाल्याचे चित्र तर सर्रास दिसत आहे. बहुतांश मुलांना मोबाईलचे व्यसन लागले आहे.
एक वर्षभराच्या काळातच इतके दुष्परिणाम दिसून आले आहेत. आणखी काळ मुलांच्या हातात मोबाईल राहिले तर अतिशय गंभीर परिणाम दिसून येणार आहेत. तेव्हा पालकांनी वेळेत सावध होणे आवश्यक आहे. सध्या अभ्यासाला सुटी असल्याने मुलांच्या हातात मोबाईल देण्याचेही कारण नाही. या सुटीच्या काळात जास्तीत जास्त कठोरतेने मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. मुलांना गप्पागोष्टी, पारंपरिक बैठे खेळ, तसेच घरातल्या घरात खेळता येतील असे खेळ, बागकाम, गोष्टींची पुस्तके वाचन, घरातील छोटी छोटी कामे, इत्यादी गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणे आवश्यक आहे. मनोरंजनासाठी एखादा सिनेमा बघणे चालू शकते. (मोबाईलपेक्षा टीव्ही कमी घातक म्हणता येईल.) परंतु मोबाईलपासून मुलांना लांब ठेवणे आवश्यक आहे.
2 टिप्पण्या
माझी शाळा माझे शिक्षण
उत्तर द्याहटवामाझी शाळा माझे शिक्षण
उत्तर द्याहटवा