कोरोनाच्या साथीने इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे शैक्षणिक क्षेत्राचेही अपरिमित नुकसान केले आहे. इतर क्षेत्रातील नुकसान सर्वसामान्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत आहे, जाणवत आहे. परंतु शैक्षणिक क्षेत्रातील नुकसान फारसे कुणाला जाणवत नाही. आणि त्यामुळेच या नुकसानीबाबत फारसे कुणी बोलतानाही दिसत नाही.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा खूपच उशिरा सुरू झाल्या.२३ नोव्हेंबर २०२० पासून इयत्ता नववी ते बारावी; तर २७ जानेवारी२०२१ पासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या. त्याही अर्धवेळ सुरू आहेत. इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग अजूनही सुरू नाहीत. आता शैक्षणिक वर्ष संपत आले. हे शैक्षणिक वर्ष संपायला केवळ एक महिनाभरच शिल्लक आहे. म्हणजे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना यंदा शाळेचे तोंडही पाहायला मिळाले नाही असे ढोबळ मानाने म्हणता येईल. शासन म्हणते ऑनलाईन स्वरूपात शिक्षण चालू आहे. प्रत्यक्षात ऑनलाईन शिक्षण किती प्रमाणात चालू आहे आणि जिथे ते चालू आहे तिथे त्याची परिणामकारकता किती आहे, याबाबत न बोललेले बरे. प्रत्यक्षात काय परिस्थिती हे थोडा वेळ बाजूला ठेऊ. शासनाच्या अधिकृत धोरणानुसार केवळ कागदोपत्री पहायचे झाल्यास पहिलीच्या विद्यार्थ्यांना अजून एक अक्षरही शिकवले गेलेले नाही. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी पहिलीच्या विद्यार्थ्यांचे अजून शिक्षणच सुरू झालेले नाही. ऑनलाईन अथवा ऑफलाईन अशा कोणत्याही स्वरूपात इयत्ता पहिलीचे वर्ग सुरू नाहीत ही वस्तुस्थिती आहे. इतर वर्गांचे निदान ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेश तरी आहेत. पण पहिलीच्या वर्गाचे शिक्षण सुरू करण्याबाबत अजून शासनाने कोणताही आदेश काढलेला नाही. जूनमध्ये शासनाने 'शाळा बंद पण शिक्षण सुरू' अशी टॅगलाईन घेऊन ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याबाबत आदेश काढला होता. पण त्या आदेशातून इयत्ता पहिलीच्या वर्गाला वगळण्यात आले होते. इयत्ता पहिलीच्या वर्गाबाबत काय करायचे याबाबत नंतर स्वतंत्रपणे सूचना दिल्या जातील असे त्यावेळी सांगितले गेले होते. आणि वस्तुस्थिती अशी आहे की आजतागायत त्या सूचना दिल्या गेल्या नाहीत. याचा अर्थ असा आहे की यंदा अधिकृतपणे पहिलीच्या वर्गाचे शिक्षण थांबलेले आहे.
मग आता पुढचा प्रश्न उपस्थित होतो की या विद्यार्थ्यांचे काय होणार? या विद्यार्थ्यांच्या बाबतीत शासनाचे अधिकृत धोरण काय असणार? पुढील शैक्षणिक वर्षात या विद्यार्थ्यांना पुन्हा पाहिलीच्याच वर्गात बसवणार का? तसे केले तर पुढील वर्षी नव्याने पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना धरून पहिलीच्या वर्गाच्या वर्गाचा पट वाढणार आणि दुसरीच्या वर्गात एकही विद्यार्थी नसणार. दुसरा मार्ग आहे या विद्यार्थ्यांना विनाशिक्षण पास करून दुसरीच्या वर्गात बसवणे. यातही अडचणी आहेत. त्यांच्या शिक्षणाचा पायाच घातला गेला नाही तर त्यांना दुसरीचे शिक्षण कसे देणार? ज्यांना अजून मुळाक्षरे सुद्धा शिकवली नाहीत त्यांना वाचायला-लिहायला कसे लावणार?
माझ्या मते शासन नेहमीप्रमाणे शिक्षकांच्यावर जबाबदारी टाकून मोकळे होईल. या विद्यार्थ्यांना सर्व क्षमता प्राप्त झाल्या पाहिजेत असे शिक्षकांना सांगितले जाईल. थोडाफार अभ्यासक्रम कमी केला जाईल. पण पुढील शैक्षणिक वर्षात पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास शिक्षकांना सांगितले जाईल. पण अजून शिक्षण सुरूच न झालेल्या त्या चिमुकल्यांना तो वेग झेपेल का? हाच प्रश्न आहे.
0 टिप्पण्या