बालभारती म्हणते, 'कुर्बान हुसेन यांचा उल्लेख योग्यच'

      
   इयत्ता आठवीच्या मराठी भाषा विषयाच्या पुस्तकातील भगतसिंग आणि राजगुरू यांच्या बरोबरीने कुर्बान हुसेन यांचा केलेला उल्लेख योग्यच असल्याचे स्पष्टीकरण 'बालभारती'ने दिले आहे. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे 'बालभारती'ने हे स्पष्टीकरण दिले आहे. सदर पाठ्यपुस्तकातील 'माझ्या देशावर माझे प्रेम आहे' या पाठात हा उल्लेख आला आहे. हा पाठ यदुनाथ थत्ते यांच्या 'प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील' या पुस्तकातून घेतलेला आहे. यदुनाथ थत्ते यांनीच त्यांच्या पुस्तकात भगतसिंग आणि राजगुरू यांच्या बरोबरीने कुर्बान हुसेन यांचा उल्लेख केला आहे. लेखकाच्या मूळ लेखनात बदल करण्याचा अधिकार 'बालभारती'ला नाही असेही 'बालभारती'ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मूळ पुस्तकातील मजकूर जसाच्या तसा पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला आहे. तसेच पाठ्यपुस्तकातील चर्चेच्या अनुषंगाने कुर्बान हुसेन यांचे क्रांतिकारक म्हणून समाविष्ट केलेले नाव योग्यच आहे. कारण कुर्बान हुसेन हे सोलापूरमधील स्वातंत्र्य सैनिक/सत्यागृही होते. त्यांना १२ जानेवारी १९३१ रोजी सहकाऱ्यांसमवेत फाशी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा उल्लेख योग्यच आहे. 
   इयत्ता आठवीच्या इतिहास विषयाच्या पाठ्यपुस्तकात आठव्या पाठामध्ये देखील सोलापूर सत्यागृहाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये कुर्बान हुसेन यांचे कार्य नमूद करण्यात आले आहे. तसेच याच पाठ्यपुस्तकात दहाव्या पाठात भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या कार्याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता क्रांतिकारक सुखदेव यांचे नाव पाठ्यपुस्तक मंडळाने वगळले असे म्हणणे योग्य नाही, असे 'बालभारती'ने म्हटले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या